सरहद्दीचा शिलेदार : किल्ले भूपतगड
लहानपण छोट्या गावात गेल्यामुळे माळरान आमराई, जंगली गवत ह्याचा एक विशिष्ट वास नेहेमीच डोक्यात राहिला होता. नंतर शहरात आल्यामुळे तो अनुभव नंतर आला नाही मात्र किल्ले भूपतगडाने बालपणाच्या आठवणी जाग्या केल्या. तत्कालीन जव्हार संस्थान आणि मराठी साम्राज्य ह्यांच्या सरहद्दीवर असलेला व शेवटपर्यंत जव्हार संस्थानाच्या अधिपत्याखाली असलेला हा भूपतगड.
३ -४ टाक्यांचा समूह, ३ -४ फूट उंचीच्या शिल्लक भिंती ज्या जवळपण ६ ते ८ फूट रुंद आहेत असा किल्लेदाराचा वाडा, अर्धवट कोरलेली जांभ्या दगडातील विहीर, २ मोडके दरवाजे , बुरुज आणि पडीक भिंती हा किल्ल्याचा संसार. मात्र संपूर्ण किल्ला हा एक सुंदर गवताचा गंध घेऊन आहे. वन विभागाने किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत रस्ता केला आहे( झाडे लावणे , मोठे करणे, जुनी झाडे आणि प्राणी वाचवणे हे सोडून वन विभाग सर्व धंधे करते हा माझा समज आता ठाम होत् चालला आहे). मात्र ह्याची सर्वात खास बात म्हणजे दिसणारा नजारा आणि बाजूच्या डोंगर रांगा , सर्व शब्दापलीकडील अनुभव. दुपारी जेवण झाल्यावर दिसणारा नजारा आणि थंड झुळूका आणि हिवाळ्यातील कोवळे उन , निघायची तयारीच होईना.
किल्ला करून जव्हार येथील नवीन आणि जुना राजवाडा , सदानंद बाबा मंदिर, शिरपा माळ ( शिरपेचाचा माळ: सुरत लुटीवरून परत येतांना येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि जव्हार चे राजे विक्रमशः यांची भेट झाली होती) करून घरी परत आलो. जर भूपतगडाला भेट देणार असाल तर कमी उंची असलेली ४ चाकी गाडी नेऊ नका व कचरा तर करूच नका. शक्यतो छोटा ग्रुप न्या म्हणजे पक्ष्यांचा आवाज , झाडांचं सुगंध, व निसर्ग अनुभवता येईल.
Comments
Post a Comment