किल्ले त्रिंबकगडावरील चिलखती बुरुज आणि दरवाजा:
प्रचंड मोठा घेरा आणि बाले किल्ला असलेला नाशिक मधील प्रमुख किल्ला म्हणजे किल्ले त्रिंबक / ब्रह्मगिरी.
यादव, बहामनी, निजामशाही, मुघल ,मराठा काळातही ह्या किल्ल्यावरून मोठे झगडे झालेले दिसतात.
राजे शहाजी ह्यांच्याकडे पण हा किल्ला काही काळापुरता होता. किल्ला ताब्यात तर नाशिक प्रांत ताब्यात असे सोप्पे गणित त्या वेळी होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे, रुपाजी भोसले व मानाजी मोरे ह्यांना नाशिक व बागलाण जिंकायला पाठवले त्यात हा किल्ला जिंकला गेला. नानासाहेब पेशव्याच्या काळात ह्या किल्ल्यावरून निजाम आणि पेशवे ह्यांच्यात बरीच खड खड झाली होती मात्र हा किल्ला १८१८ पर्यंत मराठ्यांकडे राहिला.
१८१८ मध्ये ब्रिटीशानी ५-६ दिवसाच्या झगड्यानंतर आणि हत्ती दरवाज्याजवळ ७ ते ८ गोरे अधिकारी बळी देऊन हा किल्ला जिंकला होता. ( इतके सारे गोरे एकदाच मेले त्यामुळे पार ब्रिटिश संसदेपर्यंत हा विषय गेला होता). तदनंतर किल्ला बेवसाऊ झाला. दक्षिण गंगा, गोदावरी चे उगम स्थान असल्याकारणाने भाविक काही प्रमाणात जात असत. नंतर १९ व्या शतकाच्या सुरुवातीला कराची येथील एका सिंधी व्यापाऱ्यांनी त्रिंबक गावाकडून पायऱ्या बांधून दिल्या. त्याचबरोबर एक मोठी धर्मशाळा आणि बारव पण बांधली जी अजूनही सुस्थीतीमध्ये आहे.
किल्ल्याला सध्या ह्या पायऱ्या आणि हत्ती दरवाजा हेच दोन मार्ग आहेत. नेहेमी प्रमाणे जनता जनार्दनाने मेटघर किल्ला, दुर्ग भांडार किल्ला असे त्याचे तुकडे करून टाकले कारण किल्ला प्रचंड मोठा आहे, मात्र अभ्यास केला असता लक्ष्यात येईल कि हत्ती दरवाजा आणि नवीन पायऱ्या हाच किल्ल्यावर जायला रस्ता आहे. त्यामुळे मेटघर आणि दुर्ग भांडार ह्यांचे स्वतंत्र किल्ला म्हणून अस्त्वित्व असू शकत नाही, हे दोन्ही किल्ले त्रिंबकचाच भाग आहेत. ( काही अतिहुशार दुर्ग भांडार चा उल्लेख भंडारदुर्ग असा करता जो चुकीचा आहे.)
बहुदा दुसरी किंवा तिसरी ईयत्तेत असताना मी पाहिल्यावेळास त्रिंबक किल्ला केला होता. त्या वेळेस उगमाकडे जाताना एक मोठी इमारत दिसत असे जी आता दिसत नाही. दुसरी पडकी इमारत थोडी फार तग धरून आहे. गोदावरी उगमाकडे, रोजच लोकांचा गर्दीचा ओघ चालू असतो. थोडे फार ट्रेकर्स दुर्ग भांडार आणि हत्ती दरवाजा करतात मात्र चिलखती बुरुजाकडे मात्र कोणीही जात नाही.
ज्यांनी विनायक खिंडीकडून हत्ती दरवाजा केला आहे. तेथे एका बाजूला संडे मंडे सुळके तर दुसऱ्या बाजूला डोक्यावर बुरुज दिसतो, हाच तो चिलखती बुरुज. फार मोठ्या चाली नंतर ह्या बुरुजाकडे जाऊ शकतो. जाताना एक सुंदर तळे व पडीक मोठे बांधकाम दिसते. पावसाळ्यामध्ये इकडे जाणे तर अतिकठीण असू शकते.
कारवी डोक्यावर वाढली असल्याकारणाने सध्या तरी रस्ता नव्हता व बर्याच ठिकाणीतर बनवावा लागला. खूप मोठ्या चाली नंतर दिसणारे संडे मंडे सुळके, त्या मागील अंजनेरी व अचानक दिसणारा बुरुज व त्यामधील दरवाजा, दरवाजामागील दुसरा बुरुज , सगळेच अप्रतिम. अश्याठिकाणी सांगायला आणि लिहायला शब्दच राहत नाहीत, जवळ पास २० ते २४ किलोमीटर चा हा ट्रेक सोबतच्या बाळ गोपाळ मंडळीनेही आनंदानी केला.
किल्ल्याच्या डावीकडे काय आहे हा लहानपणापासूनचा प्रश्न , उत्तर सापडल्याकारणाने पूर्ण झाला.
टीप : ह्या भागात कोणीही जात नाही त्यामुळे माकडे , तरस , बिबटे आहेत हि पण नोंद घ्या. कचरा करणार नसाल तरच इकडे जा कारण एकपण प्लास्टिक वा बाटली दिसली नाही. तेच दुसरीकडे वन विभाग झोपलेला असल्याकारणाने पायऱ्या, गंगाद्वार, गोदावरी उगम स्थान हे प्लास्टिक ने भरलेले आहेत.
Comments
Post a Comment