ब्रह्मगिरी भाग १ : औदुंबर वृक्षांचे अभयारण्य .

 ब्रह्मगिरी भाग १ : औदुंबर वृक्षांचे अभयारण्य .

श्रीगड/ किल्ले त्रंबकेश्वर / किल्ले ब्रह्मगिरी हा सातवाहन अथवा शिलाहार कालीन किल्ला आहे जो दक्षिण गंगा गोदावरी चे उगम स्थान आहे. पुराणांमध्ये ह्या ब्रह्मगिरी पर्वताला प्रचंड मोठे धार्मिक स्थान आहे.  हा संपूर्ण पर्वतच भगवान शिवशंकराचे मस्तक आहे असे समजले जाते जे दक्षिण गंगा गोदावरी मस्तकावर धारण करते.  त्यामुळेच ह्या पर्वताला श्रावणात प्रदक्षिणा करतात.  ह्या पर्वतावर जे पाच लहान डोंगर आहेत त्यांना पंचलिंग असेही म्हणतात व त्यांना ५ नावेही आहेत. येथून फक्त दक्षिण गंगा गोदावरीच उगम नाही तर वैतरणा, अहिल्या , बाणगंगा, निळगंगा ह्या बाकी ४ नद्या पण उगम पावतात.  यातील वैतरणा हि पर्वताच्या  मागील बाजूला प्रवाहित होऊन नंतर फक्त १० किलोमीटरचा प्रवास करून तिच्या प्रवाहावर बांधलेल्या वैतरणा धरणात संपते.

 हा संपूर्ण पर्वत मोठ्या मोठ्या शिळा, व अंतर्गत प्रचंड मोठे पाण्याचे साठे ह्यांनी भरलेला आहे आणि जिथे पाणी तिथे औदुंबर आणि उंबर हे फार जुने गणित आहे. पर्वतावर २५०, ४०० वर्षय जुने प्रचंड मोठ्या खोडाचे औदुंबराचे वृक्ष अगदी सह्ज दिसतात. मात्र दिवसेनदिवस वृक्षतोडीमुळे त्यांची संख्या कमी कमी होत चालली आहे.  बाकी आंबा वैगरे झाडे पण आहेत व बांबू पण.

उत्साही स्थानिक युवकांबरोबर केलेला ट्रेक हा फार मोठी माहिती देऊन गेला. गडावरील कोळी लोक ह्यांचे पूर्वज विविध मेटांचे पहारेकरी होते त्यांनी ह्या लॉकडाऊन  मध्ये बरेच मोठी मोठी टाकी व कुंड माती, कचरा काढून मोकळी केली आहेत. व ह्या पावसाळ्यामध्ये देशी वृक्ष लावणार आहेत.

ह्या औदुंबराच्या अभयारण्याला कोणाची नजर लागली आहे ? काय होत आहे नेमके ?

 

गम्मत अशी आहे कि पर्वताचा काळा  दगड / कडा  जिथे संपतो तिथून खाली लगेच सर्व बाजूने सर्व जमीन हि विविध आदीवासी व्यक्ती ,मठ, आखडे, मंदिरे संस्थान, खासगी व्यक्ती ह्यांच्या मालकीची आहे. ज्यांनी ब्रह्मगिरी पर्वत पावसाळ्यामध्ये त्रिंबक गावातून पहिला आहे त्यांच्या डोळ्यासमोर हे चित्र अगदी सहज उभे राहु  शकते. ह्या पर्वतावरून धबधबे कोसळतात तेच अहिल्या, बाणगंगा, निळगंगा नद्या ह्यांचे मार्ग आहेत आणि जिथे ते अर्ध्या डोंगरात कोसळतात तो भाग आता खासगी व्यक्तीकडे आहे. आहे ना गंमत ?

सगळ्यांना वाटत होते कि हा सर्व भाग वन खात्याचा आहे पण नाही. गंगाद्वार पायऱ्या, ब्रह्मगिरी पायऱ्या, मधील धर्मशाळा , पायर्यांच्या बाजूचा दाट जंगलाचा भाग, खालील भातखळे हा सर्व सर्व भाग खासगी आहे किंवा बळकावला आहे. काही वर्ष्यामागे एका व्यक्तीने हे मोठे धबधबे जिथे कोसळतात तेथील आदीवासी जागा मंत्रालयामधून ओपन करून घेतली आणि पार कड्याच्या कुशीतून ब्रह्मगिरीच्या पायर्या किल्ल्यावर पोहचायला अगदी थोड्या शिल्लक राहतात तिथपर्यंत रस्ता बांध्याचा घाट घातला होता. जर हा मार्ग झाला असता तर त्रंबक चे कधीच माळीण झाले असते मात्र गावामधील काही मुलांनी अगदी कमी वयातही , धमक्याना तोंड देऊन विरोध करून हे काम थांबवले होते. ( स्थानिक व्यक्तींनी दिलेली माहिती )

मात्र हा शेकडो झाडे तोडून अर्धा झालेला रस्ता आजही दिसतो व फक्त ह्या रस्त्याच्या कामात जी माती निघाली ती त्याच्या पुढील पावसाळ्यामध्ये खाली येऊन तिने जो खाली पाझर तलाव आहे तो बराच बुजवला होता. विचार करा कि जर त्या सर्व जागेची बुलडोझर लावून लेव्हलिंग केली असती तर त्रिंबक गावाचे काय झाले असते ते.  ह्याला परवानगी कोणी, कशी, का, कश्याच्या आधारे दिली, त्या वेळेस वन खाते काय खात होते हे पण खोदून काढले पाहिजे. त्याच्या थोड्या बाजूला ग्रामदेवीच्या २०० /२५० एकर जागेचे प्रकरण अजूनही चालूच आहे. पूर्वापार देवीला इनाम असलेली जमीन ट्रस्टी लोक धर्मादाय आयुक्तालयातील अधिकारयांना हाताशी धरून एका दिवसात भु माफीयांना कशी काय विकू शकतात हे पण आजपर्यंत एक ना उलगडलेले कोडे आहे. देव बघतो आहे आणि हे कलियुग आहे, जाताना जिवंतपणीच सर्व भोगायला लावूनच सोडतो हे नक्की. अर्थात हे काम परत कधीही चालू होऊ शकते कारण जागा खासगी आहे आणि दंड घेऊन आपले सरकार सोडून देते जे आताच्या तळेगाव शिवरामधील जागेबद्दल होणार असे दिसते. दंड भरा आणि डोंगर कापा , पर्यावरण उध्वस्त करा.

आताही पाझर तलावाच्या बाजूने नगरपालिकेने रस्ता बांधला आहे जो अहिल्या नदीचा प्रवाह ओलांडून पुढे खासगी जागेत जातो. फील गुड फॅक्टर येण्यासाठी बाजूला नारळाची झाडे लावली आहेत ( कर्मदरिद्री पणा म्हणतात ह्याला, स्थानिक झाडे तोडून विचित्र झाडे लावणे आणि बेगडी वृक्ष प्रेम दाखवणे ) ह्याच जागेच्या पुढे एका महाभाग व्यक्तीला रिसॉर्ट बांधायचे आहे. त्रंबक नगरपालिकेचे सर्व नगरसेवक आणि अधिकारी नेमके काय करतात हे एक फार मोठे कोडे आहे. बहुदा ह्यांना माळीण गावाची घटना मुद्दामहून त्रिंबक गावात घडवून आणायचीच आहे असे दिसते. मात्र ह्या सर्व प्रक्रियेमध्ये अहिल्या, बाणगंगा आणि निळगंगा ह्यांचा प्रवाह फार मोठ्या प्रमाणात बदलला वा बिघडवला जाऊ शकतो हे लक्ष्यात घेतले जात नाही आहे हे दुःखदायक आहे. वैतरणेचा प्रवाह तर कुंपण, कचरा, कुकूट पालन करणारे ह्यांनी सोडलेली घाण ह्यांनी भरलेला आहे. हाच प्रवाह पुढे वैतरणा डॅम मध्ये जातो. ह्या पाण्यावर राहणाऱयां शहरातील लोकांनो प्या घाण राहा छान. त्र्यम्बक गावातील दक्षिण गंगा -गोदावरी बद्दल तर मी काही बोलणारच नाही स्वतःच जाऊन बघा .

 हि झाली त्रिंबक गावामधून दिसणारी जमीन ज्यातील नील पर्वत महंत लोकांनीच पोखरून काढला आहे . डोंगर एक आणि जायला रस्ते चार, झाडे गायब आणि भयानक वैराण भास होतो हा पर्वत बघून. खेदाने म्हणावे वाटते कि श्रद्धेने नतमस्तक व्हावे असे नील पर्वतात आता काहीही राहिलेले नाही. निसर्ग हाच देव आहे आणि प्रत्यक्ष झाडांत, पाना फुलात देव वसतो हे प्रत्यक्ष साधू महंतांच्या विस्मरणात गेले आहे वाटते .

ब्रह्मगिरी जो त्रिंबक गावामधून दिसत नाही त्याच्याही सर्व बाजू कडील जमीन हि भू माफियानी बळकावली आहे. जे तळेगाव शिवारात झाले ते पुढील काही वर्ष्यात पैने भाग, हत्ती मेटचा खालचा भाग सगळी कडे होऊ शकते हे पण ध्यानात घ्या. येत्या एक दोन पावसाळ्यात सुपलीच्या मेटेची माळीण दुर्घटना होऊन सुपलीचा सुपडा साफ होणार हे सांगायला कोना ज्योतिष्याची गरज नाही . हाच प्रकार ब्रह्मगिरीच्या सर्वच  बाजूनी होणार हे नक्की.  नजर हटली दुर्घटना घटली.

 


Comments

Popular posts from this blog

Yezdi D 250 Classic: 1982 Model by Ideal Jawa Company

Fort Khairai :

Fort Dhodap