किल्ले ब्रह्मगिरी
ब्रह्मगिरी जैव विविधता अभ्यास .
१) ऐतिहासिक :
श्रीगड/ किल्ले त्रंबकेश्वर / किल्ले ब्रह्मगिरी : सदर पर्वत हा सातवाहन काळापासून किल्ला म्हणून ओळखला जातो. बाजूच्या घाट रस्त्यांवर जे कि तत्कालीन जव्हार, सुरत मार्ग होते त्यावर व आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष्य ठेवण्यासाठी हा किल्ला महत्वाचा आहे. त्रिंबकगड पडला तर नाशिक हातातून गेले इतका त्याचा लौकिक होता. राजे शहाजी ह्यांनीही काही काळ हा गड आपल्या ताब्यात ठेवला होता, छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला काही काळ आपल्या ताब्यात ठेवला होता जो छत्रपती संभाजी महाराज ह्यांच्या अमानुष वधापूर्वी परत मोगलांच्या ताब्यात गेला व तदनंतर थेट नानासाहेब पेशवे ह्यांनी हैद्राबादच्या निजामाकडून हा ताब्यात घेतला. पेशवे काळात नाशिकचा सरकारी खजिना हा ह्या किल्ल्यावर असायचा. सन १८१८ मध्ये इंग्रजांनी सादर किल्ला ५/६ दिवस लढून व बरेच गोरे अधिकारी बळी देऊन जिंकला होता.
२) धार्मिक :
त्रयम्बकेश्वर मंदिर: जुने गावातील मंदिर पाडून तेथे मोगलानी मशीद केली होती. नानासाहेब पेशवे ह्यांनी त्यांच्या काळात मशीद काढून परत नवीन मंदीर बांधलेले आहे. सदर मंदिर हे जागृत ज्योतिर्लिंग असून वर्षभरात हजारो भाविक दर्शनाला येतात.
पाच नद्यांचे उगम स्थान:
किल्ले ब्रह्मगिरी दक्षिण गंगा गोदावरी चे उगम स्थान आहे. पुराणांमध्ये ह्या ब्रह्मगिरी पर्वताला प्रचंड मोठे धार्मिक स्थान आहे. हा संपूर्ण पर्वतच भगवान शिवशंकराचे मस्तक आहे असे समजले जाते जे दक्षिण गंगा गोदावरी मस्तकावर धारण करते. त्यामुळेच ह्या पर्वताला श्रावणात प्रदक्षिणा करतात. ह्या पर्वतावर जे पाच लहान डोंगर आहेत त्यांना पंचलिंग असेही म्हणतात व त्यांना ५ नावेही आहेत ( अघोर, ईशान ,तत्पुरुष ,वामदेव ,सद्योजात ). येथून फक्त दक्षिण गंगा गोदावरीच उगम नाही तर वैतरणा, अहिल्या , बाणगंगा, निळगंगा ( किकवी ) ह्या बाकी ४ नद्या पण उगम पावतात. यातील वैतरणा हि पर्वताच्या मागील बाजूला प्रवाहित होऊन नंतर फक्त १० किलोमीटरचा प्रवास करून तिच्या प्रवाहावर बांधलेल्या वैतरणा धरणात संपते. हा संपूर्ण पर्वता मोठ्या मोठ्या शिळा, व अंतर्गत प्रचंड मोठे पाण्याचे साठे ह्यांनी भरलेला आहे आणि जिथे पाणी तिथे औदुंबर आणि उंबर हे फार जुने गणित आहे. पर्वतावर २५०, ४०० वर्ष जुने प्रचंड मोठ्या खोडाचे औदुंबराचे वृक्ष अगदी सह्ज दिसतात.
३ समृद्ध वनस्पती जीवन :
किल्ले ब्रह्मगिरी व आजूबाजूचा प्रदेश हा प्रचंड जैवविविधतेने भरलेला आहे. ह्यात काळा शिरीष, सादडा, बेहेडा, अर्जुन सादडा, जांभूळ , रायवळ आंबा , राय आवळा, भुत्या, पांढरा शिरीष, भोकर, पळस, पांगारा , कळंब, नेवार , पिंपळ , पिंपरी , कडुलिंब , पेटारा, शिसव,निर्गुडी, शिंदी , काटेसावर, हेड , वरास , खडक पायरी, रान केळी, रान हळद, इत्यादी प्रचंड मोठी झाडे आढळतात. अर्थात त्यात महत्वाची आहेत ती औदुंबराचे झाडं. ह्या सोबतच विविध दुर्मिळ औषधी वनस्पती व रान झाडे,गवत , कारवी , करवंदा सारखे वेळ व झुडूप वर्गीय वनस्पती पण भरपूर सापडतात यात झडी खरपुडी, किल्वर लांडगा लहान खुरपूडी कुळी केन चंदनी काली निसूर्डी , पिंड, पिवळा तेरडा, दुधी, निसूर्डी , सोनकी , चिरे पापणी , सल्वान, मोर, टोपली कारवी , कावळा , बिफडा, लिप्ता ,कंदीलपुष्प , रान तुळस, घटूर्ली, रान जिरे, आग्या , चिलार, चिबूड, निर्गुडी, इत्यादी जवळपास ७० पेक्ष्या जास्ती वनस्पती आहेत
४ प्राणी /पक्षी विश्व:
बिबट्या, तरस, रानडुक्कर, कोल्हा, माकडे, वानरे, घोरपड, रानमांजर, ससे, खारी, विविध सरडे सध्या मोठ्या प्रमाणात आहेत. दुर्दैवाने अफाट जंगले तोडीने पट्टेरी वाघ, हरण, काळवीट, नीलगाय हे प्राणी आपण हरवून बसलो आहोत. पक्षी विविधता : गिधाडे, मोर, घार, विविध घुबडे, मैना, पोपट, बगळे, साळुंखी, वटवाघुळे, पारवे , पावश्या, ससाणा, बुलबुल, सातभाई, तुतारी, सुतार इत्यादी ४० पेक्ष्या जास्त पक्षी आढळतात.
सद्य स्तिथी :
अपुरे मनुष्यबळ, स्वतःचा प्रदेश, नेमकी जमीन माहित नसणे ( माहित असली तरी लपवणे), ह्या वन खात्याच्या सवयीमुळे फार मोठा प्रदेश हा खासगी विकसकानी ताब्यात घेतला आहे. जळाऊ लाकडासाठी वृक्ष तोड, अनिर्बंध गुरे चराई, फार्म हाऊस-वीकएंड होम साठी जिलेटीन वापरून डोंगर फोडणे ह्यामुळे प्राणी, वनस्पती ह्यांना पण दुसरीकडे जावे लागत आहे. तसेच ठिसूळ डोंगरालापण तडे जाऊन तडे जाणे, जमीन सरकने हे प्रकार होत आहेत.
Comments
Post a Comment