एक अधिकारी

 एक अधिकारी

फार जुनी गोष्ट नाहीये, एक आटपाट नगर होतं. तिथं दर दोन-तीन वर्षांनी अधिकारी बदलून यायचे. ते आपापल्या परीने चांगले वाईट काम करायचे वरिष्ठ आणि राजकीय नेत्यांच्या संबंधानुसार टर्म पूर्ण करून वा मध्येच निघून जायचे.

असाच एकदा एक अधिकारी बदलून आला त्याने. अल्पावधीत चांगले काम करून नाव कमावले मात्र निसर्गाच्या बाबतीत त्याचा दृष्टिकोन वेगळा होता .कसेही करून त्याला आपला महसूल वाढवायचा होता. त्यामुळे येनकेन प्रकारे काहीही झाले तरी महसूल वाढवून दाखवणे या एकाच उद्दिष्टाने तो झपाटलेला होता. मग त्यात डोंगराजवळचे सपाटीकरण असो किंवा प्रत्यक्ष बेकायदेशीररीत्या डोंगर फोड करून काढलेली खनिजे असोत, त्याला फक्त महसूल वाढवणे हेच टारगेट दिसायचे


 

त्याच्या या वृत्तीला निसर्गप्रेमींनी विरोध केला. मात्र आपल्या सुपीक डोक्याचा फायदा घेऊन त्याने जिल्ह्यातील विकासकामे थांबली आहेत ,सरकारी कामांना ही खनिजे मिळत नाहीत ,कोणीही उठतात आणि संघटना काढतात आणि खाणींना विरोध करतात, आम्हाला खूप मोठे टारगेट असतात ते आम्ही पूर्ण कसे करावेत? असा अपप्रचार निसर्गप्रेमींबाबत चालू केला. खाण मालकांना त्यांच्या चुका दाखवून देता फक्त उद्दिष्टपूर्तीसाठी त्याने खाण मालकांना निसर्गप्रेमींबद्दल भडकवून द्यायला सुरुवात केली.

प्रशासनातील सरकारमधील वरिष्ठांना ही तो अतिरंजित चित्रे रंगवून सांगायचा जिल्ह्याच्या विकासाचे काम थांबायला फक्त निसर्गप्रेमीच कसे जबाबदार आहेत हे तो डायलाँग बनवून बनवून सांगायचा. मात्र त्याच वेळेस त्याने त्याच्या हाताखालील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुका मात्र तो अधिकारी पद्धतशीरपणे लपवून ठेवायचा कार्यवाही होऊ नये म्हणून जास्तीत जास्त कालहरण करण्याचा प्रयत्न करायचा.

मात्र त्याचेही एक स्वप्न होते ही सेवानिवृत्त झाल्यावर म्हातारपणी आपल्या गावाकडे जाऊन रहावे तेथील डोंगरांमध्ये वसलेल्या आपल्या छोट्याशा खेडेगावात बाजूला वाहणाऱ्या निर्मळ नदीच्या परिसरात आयुष्य कंठावे.

पुढे तो अधिकारी त्या आटपाट नगरातून बदलून गेला. त्याच्या बदलीचे विविध कारणे सांगण्यात आली काही वर्षाने तो विविध नगरांमध्ये काम करत करत सेवानिवृत्त झाला.

जेव्हा तो आपल्या गावाकडे, आपल्या घराकडे गेला तेव्हा त्याच्या असे लक्षात आले की त्याचे एक गाव गावच राहिलेले नाही .त्याच्या गावाच्या आजूबाजूचे सगळे डोंगर त्याच्या सारख्याच मोठ्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने स्थानिक खाणमालकांनी पूर्णपणे फोडून टाकलेले होते. प्रचंड मोठे मोठे डोंगर ज्यावर तो लहानपणी खेळायला जायचा त्यांचे अस्तित्वच संपले होते. डोंगर त्याच्या आजूबाजूचे रानही पूर्णपणे कापून काढण्यात आलेले होते. त्यामुळे त्याच्या गावावर इंद्रदेव रुसला होता कित्येक वर्षात तिथे पाऊस पडणे बंद झाले होते. त्यातच त्याच्या गावाच्या बाजूने वाहणारी नदी जिच्यावर तो लहानपणी आंघोळ करायचा , मित्रांबरोबर पोहायचा, ती नदी एक गटार बनून राहिली होती . तिच्यात फक्त सांडपाणी आणि कारखान्यांचे रसायन मिश्रीत पाणी वाहत होते.

त्याने मग जो कोणी अधिकारी तिथे काम करून गेला होता त्या सर्व अधिकाऱ्यांना शिव्या द्यायला सुरुवात केली,  की माझ्या इतक्या सुंदर गावाचे या अधिकाऱ्यांनी वाटोळे केले . तेव्हा त्याची मित्रमंडळी त्याला आठवण करून देऊन बोलली की , 'अरे बाबा हे तर तू पण जिथे जिथे काम केलं तिथे असेच प्रकार केलेले आहेस' . त्या लोकांनी ही तुला कळकळीने विनंती केली होती की साहेब आमचे डोंगर वाचवा,  आमचा निसर्ग वाचवा, तेव्हा तुला तुझ्या हातामध्ये असलेला कारभार आणि खुर्ची याचा गर्व होऊन तू त्या निसर्गप्रेमींना अडवायचा प्रयत्न केला होतास . आम्हीही आपल्या या गावांमध्ये अधिकाऱ्यांना अडवायचा प्रयत्न केला मात्र त्यांनीही तुझ्यासारखेच आमचे ऐकले नाही आणि बघ आता या गावाची किती भयानक अवस्था आहे ते.

हे सर्व पाहून आणि ऐकून तो अधिकारी पश्चातापाचा आगीत तडफडू लागला. त्याला सतत त्याच्या लहानपणीचे सुंदर गाव आठवू लागले. पुढे काही दिवसांनी फिरत असताना उरलेल्या डोंगरांकडे पाहात पाहात तो अचानक त्या गटारमय्या नदीत पडला दूषित पाणी पोटात गेल्याने त्याची तब्येत अति गंभीर झाली. त्याला लोकांनी तातडीने इस्पितळात दाखल केले मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही. मात्र मरतांनाही तो स्वतःला आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी त्याच्या गावाचा सत्यानाश केला त्यांना शिव्या देत मेला. 

थांबा.............. शेवट विशेष चांगला झाला नाही, आपण दुसरा शेवट घेऊ.

तो अधिकारी सेवानिवृत्तीनंतर आपल्या मुलाकडे अमेरिकेत गेला, कारण गावातील प्रदूषित वातावरणात त्याला राहता येत नव्हते. मात्र तो फ्लोरिडा मध्ये असताना जागतिक तापमान वाढीने जे ग्लोबल वॉर्मिंगचे संकट आले होते त्यात त्याच्या घराच्या आसपास जंगलातील प्रचंड मोठा वणवा पेटून सर्व परिसर जळून गेला तो अधिकारी त्यात भस्मसात झाला .

थांबा..................... हा शेवटही चांगला नाही, 

तर तो अधिकारी सेवानिवृत्तीनंतर न्यूयॉर्कमध्ये आपल्या नातेवाईकाकडे राहायला गेला कारण त्याचे गाव रहाण्यायोग्य राहिले नव्हते. मात्र तेथे दरवर्षीच येणार्या  अभुतपूर्व पुरामध्ये त्याचे घर वाहून गेले गटांगळ्या खाऊन खाऊन तो अधिकारी दुर्दैवी रीतीने परदेशातील त्या नदीत बुडून मेला.

थांबा............................... हा शेवटही नाही आवडला तर,

अधिकारी युरोपमध्ये आपल्या नातेवाईकाकडे राहायला गेला कारण त्याला भारतातील त्या प्रदूषित गावात राहायचे नव्हते. मात्र गेल्यावर काही दिवसातच युरोपमध्ये चिखलाचा प्रचंड मोठा पूर आला त्यामध्ये त्या अधिकाऱ्याचा गाळामध्ये सापडून नाकातोंडात गाळ जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला.

 थांबा.................... अजून वेगळा शेवट पाहू,

तो अधिकारी सेवानिवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियामध्ये गेला कारण त्याला त्याच्या प्रदूषित गावात राहायचे नव्हते. मात्र दुर्दैवाने तिथे कित्येक वर्ष पाऊस पडल्याने अभूतपूर्व असा दुष्काळ पडला प्यायलाही पाणी राहिले नाही. त्याने परत आपल्या गावाला यायचे ठरवले मात्र घरातच रात्री त्याला प्रचंड खोकला आला घरात प्यायला एक  प्यालाही पाणी शिल्लक नसल्याने तो पाणी पाणी करून तडफडून मेला. मरताना त्याने स्वतःला त्या देशातील अधिकाऱ्यांनाही शिव्या घातल्या की जर सर्व जगातील अधिकारी नेत्यांनी प्रामाणिकपणे निसर्ग वाचवायचे काम केले असते तर आज अशी वाईट वेळ आली नसती.

तर वाचकहो या अधिकार्याचा शेवट तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही घेऊ शकता.

शेवटी एवढेच सांगेल की वरील प्रत्येक गोष्टीत अधिकारी तर मेलाच पण निसर्गाच्या या भयानक विविध, वेगवेगळ्या अवतारामध्ये त्याचे अत्यंत जवळचे नातेवाईक ही त्याच्यासोबतच मेले होते .त्याने त्याच्या डोळ्याने त्याच्या खानदानाचा नाश पाहिला.

अशाप्रकारे त्या अधिकाऱ्याची साठा उत्तराची कहाणी अर्धीच राहिली, पूर्ण झालीच नाही.

मन लावून वाचल्याबद्दल धन्यवाद.

Comments

Popular posts from this blog

Yezdi D 250 Classic: 1982 Model by Ideal Jawa Company

Fort Khairai :

Fort Dhodap