साल्हेरची लढाई व कवी भूषण
" साल्हेरची लढाई व कवी भूषण "
मराठ्यांनी १६७० मध्ये बागलाणात हातपाय पसरण्यास सुरुवात केली. बागलाणचा मुख्य किल्ला साल्हेर जिंकून औरंगजेबाच्या जखमेवर मीठच चोळले गेले. त्यामुळे त्याने आपला दूध भाऊ बहादूरखान कोका ( कोकलताश ) ह्याला किल्ला जिंकण्यासाठी पाठवले त्याचा इख्लासखान मियाना हा मुख्य लढाऊ इसम होता ( औरंगजेब तरुण असताना दक्खनच्या सुभेदारीवर होता व त्यामुळेच साल्हेर चे महत्व जाणून होता) .
मराठ्यांच्या इतिहासात 1671 ची साल्हेर ची लढाई हि फारच महत्वाची आहे . पहिल्यान्दाच मुघल सेना आणि मराठा फौज समोरासमोरच्या लढाईमध्ये गुंतली . दर वेळेस मराठे गनिमी कावा वापरात असत मात्र ह्या लढाईमध्ये मात्र मराठे मुघलांना समोरासमोर भिडले आणि भयंकर रणकंदनानंतर मुघल माघार घेत पळत सुटले हि लढाई मराठ्यां साठी मोठ्या प्रतिष्ठेची झाली.
महाराजांच्या योजनेनुसार मोरोपंत पिंगळे कोकणातून तर प्रतापराव गुजर वरघाटाकडून (वरंधा ?) साल्हेरकडे आले. किल्ल्यामधील मराठी फौज आधीच इख्लासखानाला त्रास देत होती त्यातच मोगलांच्या दोन्हीं बाजूच्या फळ्यांवर मराठ्यांना अचानकपणे हल्ला करून कोंडून टाकले. या लढाईत मराठ्यांच्या बाजूचे सेनापती प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे, आनंदराव मोहीते, व्यंकोजी, रुपाजी भोसले, खंडोजी व गोदोजी जगताप, मानाजी मोरे, सूर्यराव काकडे, , विसाजी बल्लाळ, मोरो नागनाथ, मुकुंद बल्लाळ शिदोजी निंबाळकर इत्यादी अनेक बिनीचे सरदार लढत होते.मोगलातर्फे इखलासखान मियाना, अमरसिंग, त्याचा मुलगा मुहकमसिंग , बहलोलखान हे जोमाने लढले होते मात्र हार पावले
हे युद्ध फारच मोठे व भयानक झाले . या लढाईचे वर्णन सभासद आपल्या बखरी मध्ये करतो : चार प्रहर युद्ध जाहले. मोगल,, रजपूत ,पठाण रोहीले, तोफ़ा, हत्ती, उंट, घालून युद्ध जाहले. युद्ध होताच धुराळा असा उडाला की, तीन कोस चारी बाजू आपले, परके माणूस दिसत नव्हते.
सभासद् लिहतो कि ह्यात १० हजार माणसे मारली गेली व त्या रक्तामासाच्या चिखलात हत्ती , घोडी फसू लागली, जनावरे किती मेली हे तर माहीतच नाही. यात मोगलांची बरीच हानी झाली. राजपूत राव अमरसिंग आणि इतर लढाईत मारले गेले आणि स्वत: इखलासखान जबर जखमी झाला. यात बरेच मराठे पण मारले गेले ज्यात महाराजांचा बालपणीचा मित्र सूर्यराव काकडे पण मारला गेला. सभासद लिहीतो, 'सूर्यराव म्हणजे सामन्य योद्धा नव्हे. भारती जैसा कर्ण योद्धा त्याच प्रतिमेचा, असा शूर पडला,
या युद्धयानंतर मराठ्यांना १२५ हत्ती व सहा हजार घोडे आणि उंट मराठ्याना मिळाले. कापडचोपड,सोने ,नाणी याची पण अगणित लूट मिळाली. लढाईची बातमी व मोगलांची झालेली कापाकापी व पळापळ कळताच बहादूरखान चालून आला पण मराठे तो पर्यंत सगळी लूट घेऊन कोकणात उतरून गेले होते. नेहमीप्रमाणे हा दिवसाला 2-४ मैल ह्या मुघली हिशोबाने निरर्थक पाठलाग करू लागला
माझ्या सध्या चालू असलेल्या अभ्यासामध्ये कवी भूषण ह्यांनी बीभत्स रसात ह्या लढाईचा उल्लेख केलेला सापडला तो खालील प्रकारे :
दिल्ली दल दले सालहेर के समर सिवा,
भूषण तमासे आय देव दमकत है .
किलकती कालिका कलेजे कि कलकल करी ,
करीकें अललं भूत भैरो तमकत है.
कहु रुंड मुंड कहू कुंड भरे स्रोनीत के ,
कहू बखतर करी झुंड झमकत है .
खुले खग कंध धरी तालगतिबंध पर,
धाय धाय धरनी कबंध धमकत है .
सारांश: अश्या ह्या साल्हेरच्या लढाईमध्ये शिवाजीच्या सेनेने दिल्लीच्या मुघल सेनेला छिन्नविछिन्न करून टाकले व युद्धभूमीवर उभे असलेले चित्र कवीने बीभत्स रसात आपल्या समोर आणले. ज्यात युद्धभूमीवर खन्ड मुंड ( छिन्नविछिन्न शरीरे , मुंडके ) पडले आहेत , रक्ताने कुंड भरले आहेत , कबंध आहेत ह्याचा उल्लेख आहे. तमासे : युद्ध , देव दमकत है : (मराठे) देव शक्तिमान आहेत, रणचंडिका कालिका देवी ने कीलकारी ( आरोळी ) मारल्याने काळजात कलकल ( भय ) उत्पन्न होत आहे . सामर्थ्यशाली असे भूत पिशाच्च नाचत आहेत , चिलखते चमकत आहेत , धरणीं हालत आहे, पक्षी घिरट्या मारत आहेत असे ह्या लढाईचे वर्णन कवी करतात.
एका लढाईचे वर्णन एवढ्या खोलात जाऊन वाचायला मिळते व कवी भूषण आणि सभासद ह्याचे वर्णन इतक्या व्यवस्तिथ पणे करतात यावरूनच त्यातच साल्हेर ची लढाई किती मोठी आणि प्रतिष्ठेची होती हे कळते. ह्या लढाईनंतर मुघलांनी मराठ्यांच्या गनिमी काव्याबरोबरच समोरासमोरच्या युध्याची पण धास्ती घेतली व मोठे मोठे मुघल सरदार दक्खनेत यायला घाबरू लागले .
( लेखामध्ये काळ प्रसंगानुसार छत्रपती शिवाजी महाराज व इतर ऐतिहासिक व्यक्ती ह्यांचा एकेरी उल्लेख आला आहे जो कवीने तत्कालीन परिस्तिथिनुसार १६ व्या शतकात त्यांच्या काव्यात व नंतर कृष्णाजी अनंत सभासद यांनी केला आहे. काही तक्रार असल्यास कवी भूषण व सभासद ह्यांना जाऊन भेटणे .कारण मी पण तो संदर्भ आहे तसाच घेतला आहे.)
माहिती संकलक
- अंबरीश मोरे. नाशिक
२९ जुलै २०२०
फोटो मध्ये साल्हेरचा किल्ला फोटो : गुगल साभार
Comments
Post a Comment