*सरदारा*

सत्य कथा. गोष्ट असेल १९९०-९१ ची. मी त्यावेळी सहावीमध्ये असेन. नवीनच बांधलेल्या आमच्या बिल्डिंगमध्ये एक सरदार राहायला आले .गोरेपान पावणेसहा फूट उंच, शांत चेहरा. आपण हसलो तर हसणार नाहीतर निर्मळ चेहेर्याने समोरून निघुन जाणार. त्याच्या चेहर्याभोवती ऐक गुढ वलय होते.नवीनच रहायला गेल्याने अजून एकमेकांशी नीट कोणाशीच ओळख झालेली नव्हती मात्र सरदारजींचे ईंपोर्ट केलेल्या वस्तुंचे दुकान होते असे समजले. हळूहळू बिल्डिंग मधील लोक ऐकमेकांना ओळखु लागले. पण सरदारजी ऐकटेच राहतात हे सोडुन त्यांच्याबद्दल बाकी काहीही माहीती नव्हती. आम्ही लहान मुले त्यांना नमस्ते अंकल जी असे म्हणत असू व उत्तरा देखील ते एक मंद स्मित करून पुढे निघुन जात असत. आम्ही मुलांनी लवकरच त्यांचे छोटेसे दुकान शोधून काढलं यामध्ये आम्हाला अप्रूप वाटणार्या व त्या काळी सहसा न मिळणाऱ्या इम्पोर्टेड वस्तूंची रेलचेल होती. आम्ही मुद्दाम त्यांच्या दुकानासमोरून सायकलने जाता जाता त्यांना हात देऊन व लांबूनच नमस्ते अंकलजी असे ओरडून पुढे जात असू व तेही आम्हाला शांततेत हसून हात देत असत. महिन्या-दोन महिन्यात कधीतरी त्यांचा एक पुतण्या त्यांना भेटायला येत असे व एखादा दिवस राहून तोही निघून जात असेल. अत्यंत शांत व अबोल असणार्या या सरदारजींबद्दल सगळ्यांना कुतूहल होते. एकटेच राहणार्या व स्वतः स्वयंपाक करून खाणार्या त्यांची चर्चा बायकाही करत असत. त्यांच्या भूतकाळाबद्दल सगळ्यांनाच माहिती हवी होती मात्र त्यांच्या अबोल स्वभावामुळे विचारावे कसे हाही मोठाच प्रश्न होता. एकदा बिल्डींग मधील सर्व लोकांनी मिळून एक मोठा कार्यक्रम ठेवला व त्यात सरदारजींना अत्यंत आग्रहाने बोलावले व त्या आग्रहाला मान देऊन तेही मिटिंग मध्ये येऊन बसले . नेहमीप्रमाणे प्रत्येक जण आपापल्या नोकरी, व्यवसायाची व कुटुंबियांची माहिती देऊ लागला. सर्वात शेवटी वेळ आली ती सरदारजींची. नेहेमीच्याच शांत स्वभावाने त्यांनी आपले नाव सांगितले व व्यवसायाबद्दल सांगितले मात्र बिल्डींग मधील बायकांना इंटरेस्ट होता तो त्यांच्या फँमिलीत व शेवटी तो प्रश्न कोणीतरी विचारलाच. त्यालाही त्यांनी मंदस्मित देत सांगीतले की काही फाळणीच्या कटु आठवणी निगडीत असल्याने ते याबाबात बोलणार नाहीत तेवढ्यात बिल्डिंग मधूनच वरिष्ठ व्यक्तिमत्व कर्नल चिमा यांनी त्यांना पंजाबीतच सांगितले की आज बोलाच. तेव्हा त्यांनी दोन मिनीट डोळे बंद केले, व सर्व लहान मुले बाहेर पाठवा ही विनंती केली.
पुढील कथा जी बिल्डींग मधील मोठ्यांनी ऐकली व त्यापैकी आमचा जो एक मोठ्या वयाचा मित्र होता त्याने काही वर्षांनी त्यांच्याच भाषेत जसाचा तसा सांगितलेला अनुभव : सरदार त्यावेळेस वीस बावीस वर्षाचा अत्यंत उमदा तरुण होता. संपुर्ण पंचक्रोशीत त्याचे व्यक्तीमत्व चर्चीले जायचे. त्यांच्याच गावात ऐक अत्यंत सुंदर कौर रहायची जिच्या सौंदर्यावर सगळेच तरूण मरायचे. एकदा एका बैसाखीच्या मेळ्यात तो सरदार आणी ती सुंदर कौर समोरासमोर आले व तेव्हाच त्या दोघांना कळले की आपल्याला आपला जोडीदार मिळाला आहे. यथाकाल त्यांचे घरचे ऐकमेकांना भेटले व त्या दोघांचे लग्न ठरवले. तो दिवस सरदाराच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस होता. लाजुन खाली मान घालुन हसणारी सोळा सतरा वर्षाची कौर आणी चोरून तिचे सौंदर्य पाहणारा सरदार........................... आणी सरदार काही वेळ बोलायचा बंद झाला. बहुधा त्या सुखद आठवणीत, त्याच क्षणात अडकला होता. बर्याच वेळाच्या शांततेनंतर कोणीतरी विचारलेच की , सरदारजी आगे क्या हुवा ? आणी ते परत वर्तमानात आले. बहुदा भविष्याचे सुखाचे क्षण रंगवणाऱ्या सरदारजींना मुल्ला नेहरू आणी पंडीत जिन्हा यांनी काय गडबड करून ठेवली आहे याची जाणीवच नव्हती. लग्न ठरल्यावर काही दिवसातच सर्वत्र फाळणीचे वारे वाहु लागले. वातावरण बिघडले. सध्याच्या पाकीस्तानात असलेल्या पंजाबमध्ये सरदारजींचे गाव होते. फाळणीचे वारे त्यांच्या गावालाही जाणवु लागले. गावातील चांगल्या मुसलमानांनी शेवटपर्यंत हिंदु व शिखांचे रक्षण करू असे सांगीतले मात्र तरीही बरेच परिवार ऐकत्र येवुन हिंदुस्थानात जायची तयारी करू लागले. व शेवटी तो वाईट दिवस उजाडलाच. आजुबाजूच्या गावातील धर्मांधांनी ऐकत्र येत अल्पसंख्यक शिख व हिंदुवर हल्ला चढवलाच. हाती तलवार व क्रुपाण घेवुन काही सरदार व त्यांच्या दोनचार मुसलमान मित्रांनी प्रतिकार केला पण तो किती वेळ टिकणार ? लवकरच ते सर्व ठार झाले व ईतर सर्व जण जीव वाचवायसाठी पळू लागले. यातच सरदार जखमी होवुन खाली कोसळला आणी त्याच्या समोरच कौर आणी बायकांना पकडण्यात आले. मग सुरू झाला विक्रुतीचा नंगानाच. सुंदर दिसणार्या कौरवर गावातील कितीतरी लोकांचा डोळा होताच. त्या वासनांध जनावरांनी आणीपाळीने तीचा व ईतर स्त्रीयांचा भयानक पद्वतीने उपभोग घ्यायला सुरूवात केली. त्यातच सरदार व ईतर जखमींना खांबाला बांधुन त्यांना हा भयानक प्रकार बघण्यास मजबुर केले जात होते. कौरवर होणारा प्रत्येक बलात्कार हा अमानुष होता. गावातील सर्वात सुंदर मुलगी ऊपभोगायला मिळाली , ती पण तीच्या होणार्या नवर्यासमोर ह्या जाणीवेतुन पशुता जास्तीच वाढत होती. बसणारा प्रत्येक दणका तीच्या डोळ्यातुन पाणी काढत होता व अंगातून रक्त, मात्र तरीही तीचे डोळे रोखलेले होते तीच्या सरदारावर. ये मला वाचव अशी विनंती करणारे डोळे हळुहळू निस्तेज होत गेले. आणी त्या नंतर भयानक घडले, अर्धवट बेशुद्धावस्थेत असलेल्या कौरला जिवंत जाळण्यात आले. मुद्दाम. सरदार समोर. सांगतांना सरदारच्या चेहर्यावर चे सर्व भाव निघून गेले. शुन्यावस्था. सर्वच जण भयानक गोष्ट ऐकुन स्तब्ध झाले होते. पाच मिनिटांनी सरदारनेच पुढे सांगायला सुरुवात केली. ते सर्व पाहुन सरदादला भोवळ आली. नंतर डोळे उघडले तर त्याला कोणीतरी सोडवत होते. होय, त्या अमानुष अत्याचाराला बळी पडलेली, सर्वांगातुन रक्त निघत असलेली गावातीलच दुसरी स्त्री जिला मेलेली समजुन फेकुन दिले होते. सरदारने सुटका होताच ईतर पुरुषांना सोडवले पण त्यातील काही आधीच मेलेले होते. वाचवणारी स्त्री पण चालायच्या अवस्थेत नव्हती. तीला नाईलाजाने सोडुन व जळालेल्या कौरकडे व ईतर म्रुत स्त्रीयांकडे दुखःद कटाक्ष टाकु ईतर सर्व शेतातून, बांधावरून पळू लागले व सायंकाळी एका शेतात लपले. त्याच शेतात ऐक हिंदु कुटुंब आपल्या चार वर्षाच्या मुलीसह लपले होते. ऐकमेकांना आधार. पहाटे त्या सर्वांनी तिथुन निघायचा बेत ठरवला. पण सरदारला सतत आठवत होते ते कौरचे डोळे व तिचे अश्रु. पहाटे त्यांनी शेतातुन निघायला व सैतानांनी त्यांना शोधायला ऐकच गाठ पडली. जखमी असला तरी तरूण सरदाराने छोटी मुलगी खांद्यावर टाकुन त्याने पळायला सुरुवात केली. मागे पिसाळलेले लांडगे होतेच. सरदारला जाणवले की ऐक फटका पगडीला घासुन गेला व थोड्याच वेळात पाठीवर गरम द्राव लागु लागला. थोड्या वेळात धावतांनाच त्या मुलीचा बाप दोन चार वेळा ओरडला.. बच्ची को फेंक दे, फेंक दे. सरदारला कळेना त्याने मुलीला पाहीले तर पगडीला घासत आलेला तलवारीचा वार मुलीचे अर्धे मुंडके कापुन गेला होता व त्यातुन उडणार्या रक्ताच्या चिळकांड्या त्याची पाठ भिजवत होत्या...... त्याने मुलीला टाकुन दिले व पुढे पळत सुटला. नशिबाने पुढे पोलीस व आर्मी च्या लोकांनी वाचवल्याने ते भयानक अवस्थेत पण जिवंत भारतात आले. कौर मेरी कौर.... सरदाराच्या डोळ्यातुन अश्रूंच्या धारा लागल्या.. सरदाराने जोरात हंबरडा फोडला, त्या १९४७ च्या घटनेनंतर पहिल्यांदाच व शेवटचा. सर्व जण सुन्न. दहा मिनिटांनी कोणीही काहीही न बोलता ऊठुन निघुन गेले. बिल्डिंगमधील त्या मिटींग नंतर काही दिवसातच सरदार 'अब जि नही लगता' म्हणुन दुकान विकुन पुतण्याकडे गेले. नंतर त्यांची काही खबरबात मिळली नाही, अजुनही नाही. अंबरीष मोरे. नाशिक. ०७/११/२०२१

Comments

Popular posts from this blog

Yezdi D 250 Classic: 1982 Model by Ideal Jawa Company

Fort Khairai :

Fort Dhodap