भग्न मंदिरांचे बिलवाडी :
रविवारी अहिवंत गडाच्या ट्रेक नंतर तेथून साडेतीन किलोमीटरवर असलेल्या बिलवाडी येथील अत्यंत जुन्या अशा मंदिरांना आम्ही भेट दिली. आमचे ट्रेकर मित्र श्री प्रशांत परदेशी यांनी मागील वर्षी सातमाळा रेंज ट्रेक केला होता तेव्हा सुरगाणा तालुक्यात हरण बारी जवळ त्यांना एक नवीन बांधलेले मंदिर आढळले. त्याचे खांब हे अत्यंत जुन्या पद्धतीचे होते छताला आधार देणारे यक्ष जमिनीत गाडले होते तर जमिनीतील राक्षस छतावर लावलेले होते. त्यांनी कुतुहलाने विचारले असता जवळच बिलवाडी येथे खूप पडकी मंदिरे असून ज्याला लागेल तो ट्रॅक्टर भरून नक्षीदार दगडी घेऊन येतो असे गावकऱ्यांनी सांगितले. त्यांना आत्यंतिक धक्का बसल्याने त्यांनी सदर मंदिराला भेट दिली असता अत्यंत वाईट अवस्थेतील मंदिरे त्यांना दिसली. म्हणूनच त्यांनी आवर्जून ट्रेक नंतर मंदिरांना भेट द्या असे आम्हाला सांगितले होते. दमलेले असूनही सर्वजण मंदिराकडे रवाना झालो. शासनाने? नुकताच मंदिरापर्यंत रस्ता बनवायचे काम हाती घेतलेले आहे, तेही अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने. की ज्यात रस्ता हा थेट मंदिराला लागूनच काढलेला आहे. तसेच रस्त्यात येणारी प्रचंड मोठी झाडे ही विनापरवाना तोडलेली सापडली. हे बहुदा भगवान विष्णूचे मंदिर असावे. छतावरती प्रचंड माती, झाडे व गवत उगवलेले,जवळपास पडायच्या बेतात असलेले मंदिर पाहून हृदयात कालवाकालव झाली. मंदिराचा गाभारा अत्यंत सुंदर असून त्याचे छत हे कोल्हापूरच्या कोपेश्वरापेक्षाही अधिक सुंदर आहे असे पाहताक्षणी जाणवले. गर्भगृहामध्ये पाणी भरलेले असून तेथे विष्णू किंवा इतर देवाची मूर्ती दिसली मात्र मंदिराबाहेर नंदी होता त्यामुळे आम्ही बुचकळ्यात पडलो. नशिबाने स्थानिक शेताचा मालक सायंकाळी गुरे घेऊन घरी जात असताना आम्हाला भेटला. त्याने सांगितले की मंदिरासमोरील जागेचे सपाटीकरण चालू असताना खोदकामात नंदी सापडला म्हणून तो मंदिरासमोर नेऊन ठेवला. हा त्या मंदिराचा नंदी नाही. मात्र हे बोलतानाच त्याने सांगितले की येथे अजूनही अशी बरीच मंदिरे आहेत व ती माती व दगडाखाली झाकली गेलेली आहेत. संध्याकाळ होत असूनही आम्ही एक छोटी शोध मोहीम राबवली या मध्ये मंदिराच्या मागेच नदी ओलांडून गेल्यावर ती लांबूनच एक शेंदूर फासलेला दगड दिसत होता त्याचे जवळ जाऊन पाहिले असता पायथ्यालाच अर्धवट तुटलेला वीरगळ सापडला .असाच एक संपुर्ण अवस्थेतील वीरगळ मंदिरालाही टेकून ठेवलेला आहे. त्या तुटलेल्या विरगळामागे एक प्रचंड मोठा निवडुंग आहे व त्याच्या खालीच अस्ताव्यस्त पडलेले अत्यंत सुंदर नक्षीदार प्रचंड असे दगड आहेत. हे ही एक संपूर्ण मंदिरात पासून काळाच्या ओघात पूर्णपणे धाराशाही पडल्याने त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात गाळ ,माती जमा झाल्याने झाडांनी आपले आच्छादन मांडले आहे .प्रचंड मोठ्या अवस्थेतील दोन शिवलिंग हेही येथे पडलेली आहेत .हे पाहून शोक करत आम्ही तेथे गाडी लावली तेथे गेलो. तर ज्याच्या घरासमोर गाडी लावली होती त्या घर मालकाने आम्हास सांगितले की त्याच्या शेतातही तसेच मंदिर होते मात्र त्या मंदिराचे सगळेच दगड लोकांनी घर बांधायला, शेताला बांध म्हणून ,अथवा ट्रॅक्टर ट्रक मध्ये घालून वेगवेगळ्या गावांना घेऊन गेले. मात्र हे सांगताना त्याने समोर अजून एक पडीक मंदिर आहे ही माहिती पण दिली. तेथे गेलो असता दगडांचा प्रचंड ढिगारा गवत आणि झुडपांमध्ये लपलेला आहे हा दिसून आला. वाईट तर फार वाटले, पण इतकी सुंदर मंदिरे सरकार ,पुरातत्त्व विभाग यांच्या नजरेतून सुटली कशी हे मात्र कळत नाही . सदर गाव हे पूर्वीच्या जुन्या गुजरातला जोडणार्या व्यापारी मार्गावर असल्याने तत्कालीन राजांनी ही मंदिरे बांधली असावीत असे वाटते .कारण गावामध्येच दोन प्रचंड मोठ्या बारवा आहेत. यातील एक बारव ज्याच्या शेतात आहे त्याने पूर्णपणे बुजवून तिचे खांब गाई-बैल बांधायला काढून आणले आहेत. तर दुसरी बारव कशीबशी तग धरून आहे. मागील वर्षी जो अचल्याचा ट्रेक केला तेव्हा अहिवंतवाडी येथील मारुती मंदिरातही असेच खांब व दगड उलटेपालटे लावलेले आम्ही पाहिले होते. स्थानिकांना विचारले असता डोंगरापलीकडे गावातून आणले एवढेच त्यांनी सांगितले होते .तेही नक्कीच बिलवाड्यातील मंदिरांचे खांब होते यात दुमत नाही. आता पुढील प्रश्न असा आहे की ह्या मंदिराचे भविष्य काय आणि जे नवीन रस्त्याचे व मंदीराच्या दुरुस्तीचे काम हातात घेण्यात आलेले आहे हे कितपत शास्त्रीय पद्धतीने होणार? Ambrish More 21 November 2021
Comments
Post a Comment