फुलपाखरांचा किल्ला अहिवंत गड:
नाशिक पासून जवळपास साठ किलोमीटर अंतरावरती सप्तशृंगी गडाच्या अगदी समोर जो प्रचंड विस्ताराचा डोंगर दिसतो तोच आहे किल्ले अहिवंत गड. ईखारा, धोडप ,मार्कंडेय, सप्तशृंगी गड, अहिवंत गड, अचला ही एक किल्ल्यांची लाईनच आहे जि पुर्वीच्या व्यापार रस्त्यांची सुरक्षितता ठेवत असे. सदर किल्ल्यांचा इतिहास सातवाहन काळापासून असून तेव्हापासूनच हे किल्ले उपयोगात असावेत असे दिसते. सप्तशृंगी गडाकडे न वळता डावीकडे दरेगावकडे वळताच एक नवीन रस्ता दरे गाव ते बिलवाडी असा डोंगर फोडून झालेला आहे. ह्या रस्त्याने गेल्यास किल्ल्याच्या पोटाला गाडी लावता येते व तेथून किल्ल्याच्या पोटातुनच एक रस्ता हा मुख्य दरवाज्याकडे जातो. प्रचंड झाडी व पुढे आलेल्या डोंगरामुळे शेवटपर्यंत किल्ल्याचा प्रवेश कुठे आहे हे समजून येत नाही. हा किल्ला यादव, बहामनी, आदिलशाही, मोगल ,मराठे परत मोगल व नंतर परत मराठेशाहीत आला अशा नोंदी सापडतात. सुरतेच्या स्वारी आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांना नाशिक व बागलाण वर पाठवून एकाच धडाक्यात सर्व किल्ले जिंकून घेतले होते त्यातच हा गडही होता. मात्र एकच वर्षाने मोगलांच्या जवळपास चाळीस हजार सैन्याने अचानक हल्ला केल्याने किल्लेदाराला हा गड गमवावा लागला. हा या रांगेतील धोडप नंतर मुख्य गड होता. गड कसा काय पडला असेल असे आश्चर्य नेहमीच वाटत असे मात्र जेव्हा किल्ल्याची चढाई चालू केली तेव्हा लक्षात आले की प्रचंड विस्ताराचा गड आणि त्याच्या राखणीला कमी सैनिक असे असेल तर किल्ला हातचा जाणारच. किल्ल्याच्या सुरुवातीलाच दोन पूर्णपणे उध्वस्त दरवाजे दिसतात किंवा असावेत असा अंदाज बांधता येतो. बाजूलाच कोरलेली टाकी डाव्या व उजव्या दोन्ही बाजूला आहेत .यामध्ये एका टाक्यांमध्ये किंवा गुहेमध्ये मुक्कामही करता येतो इतपत स्वच्छता आढळली व त्यामुळेच मुंबईचे तीन ट्रेकर्स रात्री मुक्कामाला आलेले होते. पुढे वर चढून गेल्यावर किल्ल्याचा किल्ल्याचा मूळ घोड्याच्या नालेसारखा विस्तार समजायला सुरुवात होते. उजव्या हाताला आपल्याला अचला व बिलवाडी चे दाट जंगल दिसते तर डाव्या बाजूला सप्तशृंगी गड, मार्कंडेय धोडप ,ही बाजू दिसते व पाठीमागे दिसतो तो शिडका म्हणजेच मोहनदरी चा किल्ला. किल्ल्याच्या डाव्या अंगाला पाण्याची दोन प्रचंड मोठी टाकी असून उजवीकडे अजून एका पुरलेल्या पायरी कडे जाताना रस्त्यात पाण्याचे भलेमोठे टाके खोदलेले दिसते .याच्यापुढे काही पायर्या असून सदर भाग हा फार पूर्वी तटबंदी व दरवाजाने बंदिस्त असावा असे अनुमान काढता येते. पुढे गेल्यावर पश्चिमेच्या बाजूला म्हणजे उजव्या हाताने चालत राहिल्यास आपल्याला अहिवंतवाडी, अचला हा भाग दिसत राहतो व पुढे गेल्यानंतर एक अगदी छोटेसे अष्टकोणी चिरेबंदी दगडात बांधलेले टाके म्हणता येणार नाही मात्र नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत दिसतो जो बारामाही आहे व त्यातील पाणी कधीही कमी होत नाही. ह्याच्या शेजारीच खंडोबाची भग्न मूर्ती असून ती सिमेंटमध्ये रूतवलेली आहे. हे पाणी पिण्यायोग्य असून रात्री मुक्कामाला आलेल्यांना पाणी भरायला काहीही हरकत नाही .मात्र ह्याचाच प्रवाह जो पुढे जातो तेथे गावातील लोक त्वचा विकार बरा होतो या भावनेने पाण्यात आंघोळ करून अंगावरची कपडे तेथेच फेकून निघून जातात. हा नजारा अत्यंत खराब दिसतो. आम्ही हा प्रवाह शक्य तेवढा स्वच्छ करायचा प्रयत्न केला. यामध्ये मोठ्या प्रमाणात कपडे ,चप्पल-बूट बाटल्या ,कुरकुरे वेफर्स चे पाकिट ग्लास पडलेले होते. मात्र थोड्यावेळाने असे लक्षात आले की त्यांची संख्या एवढी प्रचंड आहे की मोठी यासाठी टीमचीच गरज आहे. त्यामुळे प्रयत्न सोडून द्यावा लागला. पुढे गेल्यानंतर अगदी मोजकी काही मोठी झाडे दिसतात व अहिवंतवाडी च्या बाजूने डोंगराच्या पोटाला एक मोठी गुहा आहे ज्यामध्ये रात्री तीस ते पन्नास माणसे आरामात झोपू शकतात. मात्र येथे उत्रायची वाट थोडी बिकट असून नवीन लोकांनी येथे न उतरलेलेच उत्तम. पुढे गेल्यानंतर आपल्याला लागतो तो प्रचंड विस्तीर्ण तलाव व त्याच्या बाजूलाच एक अर्धगोलाकार घुमटी व पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेले गडाचे रक्षक हनुमान ,सप्तशृंगीच्या मूर्तीची प्रतिकृती असलेली देवीची मूर्ती, शिवलिंग, सुंदर कोरीव दगडी दिवे इत्यादी .याच रस्त्याने पुढे गेल्यास आपल्याला औदुंबराची प्रचंड जुनी झाडे दिसतात व पुढे आहे ती बुधला माची याला स्थानिक बुदल्या म्हणतात. याला चढायला अत्यंत छोट्या पायऱ्या असून वरती काही टाकी आहेत. या बुदलाच्या बाजूनेही किल्ल्यावर यायला रस्ता आहे. परत फिरून आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला कड्याच्या पोटामध्ये कोरलेल्या गुहा दिसतात ज्या पाण्याने पूर्णपणे भरलेल्या होत्या. वनखात्याने येथे उतरायसाठी भलीमोठी भरभक्कम शिडी लावलेली आहे. मात्र नेमका दरीच्या बाजूचा आधार तुटलेला असल्याने जपूनच चढ-उतर केलेली चांगली. हा किल्ला पाहिल्यावर आठवले ते बालपण. कारण आमच्या लहानपणी गावांमध्येही प्रचंड प्रमाणात रंगीबेरंगी फुलपाखरे दिसायची ती मागच्या किती एक वरशात न बघितलेले सर्व फुलपाखरे आम्हाला या किल्ल्यावर आढळली. एकंदरीत संपूर्ण गड पाहायचा असल्यास 15 ते 16 किलो मीटरची चाल होते .गडावर अगणित घरांचे जोते आढळले. बाकी किल्ल्यांवर दहा पंधरा वीस पर्यंत संख्या आढळली होती मात्र अहिवंत गडावर नंतर नंतर आम्ही जोते मोजणे सोडून दिले. बहुदा गडाच्या विस्तारा मुळे गडावरती जास्ती लोकसंख्या रहात असावी असे वाटते. कर्नल प्रॉथर याने अठराशे अठरा मध्ये किल्ला जिंकला त्यावेळेस या किल्ल्याचे वर्णन अंधकारमय व आरोग्यासाठी घातक असे केले होते .यावर फक्त पाच लोकांची शिबंदी होती असेही उल्लेख आढळतात . म्हणजेच अति प्रचंड जंगल असलेला हा किल्ला सद्यस्थितीला पूर्णपणे उघडा बोडका झालेला आहे .मात्र येथेही आम्हाला बिबट्याने अनाहूतपणे दर्शन दिले व झपाट्याने तो खालच्या बाजूला पसार झाला. पूर्वी गडावर एक मोठा वाडा होता व आमचा अर्धा किल्ला पाहून होत असतानाच पनवेल येथे शिक्षक म्हणून असलेले श्री भरत राऊत आम्हाला भेटले व त्यांच्यामुळे गडाचा बराचसा माहीत नसलेला इतिहास व माहिती मिळाली सदर वाडा त्यांच्या लहानपणी बर्यापैकी चांगल्या अवस्थेत होता मात्र गुप्तधनाच्या लालसेने स्थानिकांनी पूर्ण वाडा पाडून टाकला. दुर्दैव अजून काय .सकाळी नऊ वाजता चालू केलेला ट्रेक सायंकाळी सव्वा पाच वाजता संपला. एवढा मोठा ट्रक आमच्या सौ तसेच चिरंजीव आणि आमचे मित्र श्री किरण पाटील व त्यांचाही लहान मुलगा शिवराज यांनी आनंदाने केला .छत्रपती शिवाजी महाराजांच्या बागलाण भागात स्वराज्य विस्तार करायसाठी या किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली तो बघता आल्याने मनापासून आनंद झाला. अंबरीश मोरे नाशिक 22 नोव्हेंबर 2021
Comments
Post a Comment