नाशिक आणि ब्रिटिश
नाशिक आणि ब्रिटिश
काही कामानिमित्त शहरातील एका वेगळ्याच जागेत जाणे झाले जिथे सहसा लोक जायला घाबरतात. जीपचे काम असल्याने टाईमपास म्हणून सभोवतालच्या भागात फिरत असताना अचानक माझी नजर' ख्रिस्ती कब्रस्तान'लिहिलेल्या गेटवर पडली. नेहमीप्रमाणे अंगातला इतिहास अभ्यासक जागा झाला. स्थानिक मणीयार नावाच्या माणसाला सोबत घेऊन कब्रस्तानात प्रवेश केला.
आता कबरस्तान काय फिरायची जागा नसते ,मात्र यामध्येही काही ना काही ऐतिहासिक दुवे मिळतातच. प्रचंड मोठी जागा, लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे सजवलेल्या कबरी, वाळलेली फुले, हे पहात असतानाच माझा सोबतच्या ईसमास एकच प्रश्न विचारत होतो की, येथे ब्रिटिश काळातील कबरी नक्कीच असणार. त्याने सांगितले की त्याच्या लहानपणी सदर भाग प्रचंड झाडाने भरलेला होता. गेटच्या बाजूलाच एक प्रचंड मोठी विहीर होती आणि दाट झाडीमुळे या भागात यायला लोक घाबरायचे .आता येथे सर्व जुना गाड्यांचे पार्ट खरेदी विक्री करणाऱ्या दुकानांनी बकालपणा आणलेला आहे.
आणि अगदी शेवटी फिरून बाहेर निघत असताना एक कोपरा दुर्लक्षित झाला होता तेथे मला ब्रिटिशकालीन कबरी सापडल्या. बहुतांश कबरींची दुरावस्था झालेली असून कृतघ्न लोक डब्बा घेऊन पहाटेचे विधी कबरींवर करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत असे आढळले. या ब्रिटीश कालीन कबरींची संख्या बरीच कमी राहिली आहे. कारण विचारले असता नवीन कबरींना जागा पुरत नसल्याने बराच वेळा जुन्या कबरी नामशेष करून त्याजागी नवीन व्यक्तींना पुरले जाते असे सांगण्यात आले .
नासिक मध्ये बरेच आधीपासून ब्रिटिश लोक असावेत असे दिसते कारण 1920 ,1900 , 1858, 1854 असा उलटा प्रवास करत करत 1816 सालची कबरही येथे दिसली. नाशिकमध्ये पेशवाईचा अंमल असतानाही ब्रिटीशांचा वावर बऱ्यापैकी होता असे दिसते. यामध्ये तीन महिन्यांच्या बाळापासून ते पन्नास वर्षापर्यंतच्या लोकांच्या कबरी पाहायला मिळाल्या. त्याकाळी सरासरी जीवनमान कमी असावे असे दिसते .कबरी कॅनेडियन लोकांच्या असण्याचीही शक्यता आहेत.
यामध्ये महत्वाची कबर सापडली ते म्हणजे नाशिकचे तत्कालीन एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर जे लेफ्टनंट कर्नल होते यांची व त्यांच्या बायकोची. यावर अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.
अंबरिष मोरे .नाशिक
Comments
Post a Comment