राजाची वाट
राजाची वाट
जानेवारी महिन्यानंतर ट्रेक थांबून गेले होते. आज जवळपास सव्वा तीन महिन्याने ट्रेकला जायचा योग आला. दुगारवाडी गावाजवळून पूर्वीची राजाची किंवा घोड्याची वाट जाते. या रस्त्याने बैलगाडी किंवा अवजड वाहने जाऊ शकत नाहीत, मात्र हलके सैन्य, घोडदळ जाऊ शकते अशी रचना आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुट करताना याच रस्त्याचा वापर केला होता असे स्थानिकांचे म्हणणे आहे. सकाळी वेळ न मिळाल्याने दुपारी तीन वाजता नासिक वरून आम्ही चार जण या जागेला भेट देण्यास रवाना झालो . गाव हे डोंगर उतारावर व खूपच अवघड रस्त्या वर वसलेले आहे मात्र जीप फोर बाय फोर असल्याने बराचसा रस्ता आरामात कापता आला. ट्रेक कमी आणि फोर बाय फोर चा आनंद जास्ती घेतला गेला.
गावापासून खाली उतरून गेल्यानंतर वाघ नदी लागते पावसाळ्यामध्ये वाघासारखी प्रचंड वेगाने वाहत असल्याने बहुदा हे नाव पडले असावे. दुगारवाडी धबधबा च्या बाजूने काचुरली ने जो पायवाटा रस्ता येतो तो या वाघ नदीवरून वळून पुढे गोंद्या घाटाला मिळतो. याच ठिकाणी अत्यंत जुने असे पुलाचे ? अवशेष पाहायला मिळाले .यावर बहुदा ब्रिटिश काळात थोडीफार डागडुजी ही झाली असावी, कारण खडीचा बारीक थरही यावर पाहायला मिळाला. बहुतांश पुल जोरदार प्रवाहामुळे वाहून गेलेला असून अगदी एकच छोटा तुकडा शिल्लक आहे.
नदीपात्रात काही ठिकाणी पाणी दिसले मात्र हे साठलेले पाणी असून पिण्यायोग्य नाही. दुगार वाडी गाव हे फक्त चाळीस वर्षापूर्वी वसलेले असून स्थानिकांच्या कृपेने जंगल बऱ्यापैकी गायब झालेले आहे. मात्र जे शिल्लक आहे ते ही सुंदरच आहे. वनपट्यांचे वाटपही जोरदार झालेले दिसते. त्यामुळे दाट जंगलातील झाडे तोडून बऱ्याच ठिकाणी शेती होताना दिसली.
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जलसंधारण विभाग यांच्या अवकृपेने चिंचोळ्या डोंगर मुखापाशी नवीन छोटे धरण होणार आहे व त्याची मोजणी झाली आहे असे स्थानिकांनी सांगितले. सदर जागा धरण बांधायच्या लायकीची तर नाहीच पण त्या धरणाचे फायदे स्थानिकांनाही विशेष नाहीत, कारण वरती फक्त छोटे दोन तीनच पाडेच आहेत. वाघ नदी प्रचंड वेगाने दगड-गोटे माती घेऊन जव्हार जिल्ह्यात जाते. त्यामुळे अतिप्रचंड जंगलतोड करून बांधलेल्या धरणाचे भविष्य काय हाही एक मोठाच प्रश्न आहे.
स्थानिकांनी सांगितल्यानुसार पूर्वी नदीला जवळपास अकरा महिने तरी पाणी राहायचे. मात्र वृक्षसंपदा जसजशी कमी होत आहे तसे नदीतील पाण्याचे प्रमाणही कमी होत चाललेले आहे. त्यामुळे 55 टक्के भागीदारी मिळावी म्हणून धरण बांधण्यापेक्षा सदर भागात जास्तीत जास्त देशी वृक्षलागवड करून वनसंपदा कशी जपता येईल हे पाहणे गरजेचे आहे. वन विभागाने सदर धरणाचा प्रस्ताव नाकारावा व नाकारण्यास तेथील सुंदर वृक्षराजी हे महत्त्वाचे कारण आहे.
कारण जिथे दाट सुंदर झाडी त्या डोंगर भागात धरण हे सरकारी अधिकाऱ्यांचे तत्व आहे आणि याला कारण आहे जंगल साफ करून लाकडातून मिळणारा काळा पैसा. स्थानिकांसाठी पाणी वगैरे या फार पुढच्या गोष्टी झाल्या बांधकामातून व वृक्ष तोडून मिळणारा पैसा हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून अशी कामे काढली जातात हा आतापर्यंतचा अनुभव आहे.
गावामध्ये आम्हाला शाळा हे दिसली जी सध्या सुट्टी असल्याने बंद होती. शाळेच्या बाहेर ठेकेदाराने बसवलेली खेळणी ही दिसली. फोटोमध्ये तुम्हाला कळेलं की तिथल्या लहान मुलांनी ती खेळणी कशी खेळावी वा खेळू नयेत ? गावाला कच्चा का होईना छोटा रस्ता आलेला आहे व आता मोटरसायकलवाले तरी येत जात आहेत. गावाच्या अगदी जवळ पोहोचणारी पहिली चारचाकी गाडी म्हणजे आमची जीपच होती . परत वर चढवताना नाईलाजाने फोर बाय फोर चा वापर करावाच लागला.
एकंदरीत छोटासा ट्रेक मस्त झाला
अंबरिष मोरे. नाशिक.
17 April 2022
Comments
Post a Comment